Thursday, June 18, 2009

शुन्य


लोकांसारखे चंद्रतारे तोडायला
मला कधी जमलेच नाही
माझ्या चेह-यावरचे प्रश्नचिन्ह
मीच कधी काढलेच नाही
का? कुठे? कधी? कशाला?
ह्यात नुसता गुरफटत होतो
वादळातील पानांसारखाच
नुसताच भरकटत होतो
दिशाहीन ध्येयहीन…..
होतो बस्स एक “शुन्य”
कसलीही किंमत नसलेला
होय तोच शुन्य मी…….
जगाने “नाकारलेला”
तरीही गाळता न येणारा..
जगत होतो आयुष्य
जगणं कसलं कुंठत होतो
रोजचा दिवस वजा करत होतो
आय़ुष्यातुन
चला आजचा अजुन एक दिवस संपला
हा आनंद व्यक्त करत
पण तरीही हे जिणंकाय जिणं झालं नाही....
मला माझं आयुष्य
माझ्या त्या शुन्यापासुनच घडवायचयं
सगळं नवीन……
अगदी सगळं…..
बाकी काही नको मला
बस…….

हवी तुझी साथ मला

देशील ?

जेंव्हा माझ्या मनात मी डोकावतो


जेंव्हा माझ्या मनात मी डोकावतो
तुझ्या माझ्यात असण्याचाच मला भास होतो
विसरुन जातो सारे दुःख मी
अन तेंव्हा फक्त तुझाच होतो
सर्वस्वाने तुझाच...
तु दिसतेस मला हसताना,
गालावरील एक बट हळुवार सारताना
नाजुक निरागस जणु स्वर्गातीलच परी
फक्त कल्पनेतील नसतेस असतेस एकदम खरी
माझी “गोंडस परी"
दिसतेस तु स्वच्छंदी उडताना
मनमोकळे हसुन जादु नकळत करताना
पाऊस कोसळु लागला की मनापासुन भिजताना
अन मग येऊन हळुच मला बिलगताना
पाहीलेय मी तुला माझ्यात एकरुप होताना


ती...............



त्या रात्री ति चंद्राला निरखुन पाहात होती
आव्हान वाटलं बहुतेक
म्हणुनच कदाचीत काळ्या ढगांचे अस्तर ओढुन घेतलं त्याने
तिच्या थरारत्या ओठांनी आज तोही हळवा झाला होता
दुरवर कुठेतरी गुणगुणणारा पावाही आज आर्त सुर गात होता...
पण का ते कोणास ठाऊक?
आजवर मंद वाहणारा वाराही आज बेभान झाला होता
जणु त्याच्याही मनात विचारांचे वादळ घोंगावत होते
अगदी तिच्या सारखेच....
खिडकीबाहेर रातकिड्यांची किरकिर
रात्रीची खिन्नता अजुनच वाढवत होती...
पण आज त्यांच्याही गाण्याला एक वेगळीच खोली होती
कोणालाही मोजता न येणारी,
गुढ अशीच....
अन मी होतो तसाच स्तितप्रध्न
तिच्या पाठमो-या आकृतीकडे पाहात
ढग दाटुन आले आभाळात
अन ति धावतच गेली अंगणात
वेड्यासारखीच…..
धोधो कोसळणारा पाऊस अंगावर झेलत भिजत होती
नुसतीच आभाळाकडे पाहात
आकाशात सौदामीनीचे रौद्र नृत्य सुरु झालेले
पण ति अजुनही तशीच होती
उभी .... चंद्राकडे पाहत...
पण का ते तिलाच ठाऊक

वेडी


तुला ना काही रितच नाही
दर भेटीला म्हणायची
उगाच खोटं खोटं चिडुन मग
माझ्यावर लटकं लटकं रागवायची
माझी वेडी माझ्यावर खुप प्रेम करायची
तोंड फुगवुन बसायची
आम्ही चिडलोय तुमच्यावर
आम्ही नाही बोलत जा
नेहमीच असं बोलायची
माझी वेडी माझ्यावर खुप प्रेम करायची
मला हसताना बघुन
मग मनसोक्त हसायची
मला रडताना बघुन
माझे डोळे पुसायची
माझी वेडी खरचं माझ्यावर प्रेम करायची
रुसायची फुगायची
कधी दोन टिपं गाळायची
पाहायची स्वप्ने जगण्याची
त्याच वेड्या आशेवर जगायची
माझी वेडी खरंच माझ्यावर खुप प्रेम करायची

नेहमीच तुमचाच

ओंकार

खेळ अस्तित्वाचा


अस्तित्वाचा खेळ
पण कोणाच्या तुझ्या की माझ्या ?
तुच ठरव म्हणतेस नेहमीच नाही जगु शकत माझ्याशिवाय
क्षणभरही…..
मग नेहमीच का हा अट्टहास दुर जाण्याचा
का नेहमीच विषाची परीक्षा
का नेहमीचा टांगता विरह
अगदी सहज म्हणुन जातेस,
थोडेसं “अंतर” हवेय मला
पण तुझे ते “अंतर” माझ्यासाठी जिवघेणे ठरतेय
वाटतेय सगळे संपुन जावे ह्या क्षणी
पण तुझा विरह न व्हावा
कारण तेंव्हा उगाचच डोळे भरुन येतात
अन अश्रु पुसायला तुझे हात जवळ नसतात
भरुन येते माझे मन
पण डोके टेकवायला तुझे खांदेच जवळ नसतात
वाटते ह्याक्षणी कुपीतुन मुक्त व्हावे...
जाऊदे……
तुझ्यासाठी असतो,
तो केवळ अस्तित्वाचा प्रश्न
अगदी अनाकलनीय, गुढ
अंतरंगात बरेच काही लपवुन
कणाकणाने मारणारा तुझा तो खेळ
बस.... तुझ्या अस्तित्वाचा खेळ

नेहमीच तुमचाच

ओंकार

Wednesday, June 17, 2009

बरस रे मेघा


बरस रे मेघा
वाटतं पावसात चिंब भिजावं
पण नेमकं तेव्हाच आभळ दाटून येत नाही
नेहमीच......
....जेव्हा नसतं भिजयचं
तेव्हा कोसळतोअगदी खुळ्यासारखा....
..येतो धावत धरणीला बिलगायला
वेडया प्रियकराच्या वेडया ओढीने..
अन्....अन् कधी बसतो हिरमुसून
या अथांग आकाशाच्या एखाद्या कोप-यात,
अगदी.. अगदी हट्टी लहान मुलासारखा
...पण आज मला भिजायचंय
...चिंब चिंब व्हायचंय
...रे मेघा... बरस न एकदाचा
अगदी झुंजार पाउस म्हणतात की काय न अगदी तसा
...मी भिजेन तेव्हा मला तुझ्या कुशीत घे
...आज मला ..खरं खरं सांगू ?
खूप खूप रडायचंय... अगदी मनसोक्त रडायचंय..
मी रडत असताना मला तुझ्यात सामावून घे
मला तुझ्यात इतकं एकरूप व्हायचंय
...आणि विदूषकालाही रडू येतं हे जगापासून लपवायचंय
...रे मेघा...बरसशील न....
फ़क्त एकदा माझ्यासाठी...
या वेड्या विदूषकासाठी...
बरस रे मेघा......
नेहमी तुमचाच,
ओंकार