Wednesday, June 6, 2012

तुझीच कविता.....


तु रुसायचं ,अकारणच भांडायचं
हसायचं ,एकमेकांना समजवायचं
आपलं नातं अगदी असचं जपायचं
सोबतीने..अगदी सारं शिकायचं


एकमेकांसाठी जगत राहायचं
स्वप्नांना...मुर्त रुप दयायचं
स्वप्नांच्या दुनियेत रंगुन जायचं
आयुष्याचं पान  नव्यानेच लिहायचं


पानावर...असेल नविन अध्याय...
पावलाला लाभेल पुर्णत्वाचा न्याय...
श्वासांगणीक ध्येयाच्या  जवळ जायचं
नव्या जगाला उमेदीने सामोरं जायचं


तु असचं हसत राहायचं  
मी तुला बघत राहायचं
आयुष्यातलं चुकार वळण
सहजच मागे टाकायचं
अन मग तुझ्या अदांना
मी सहज..कवितांत गुंतवुन टाकायचं


ओंकार


Tuesday, May 15, 2012

नसतेस तु घरी जेंव्हा



सये नसतेस तु,
घरी जेंव्हा
आजकाल
खरचं काहीच सुचत नाही...
तुझ्या आठवांशिवाय...
विचारांमध्ये
इतर काहीच डोकावत नाही
मी घरी आल्यावर,
तुझं ते हळुवार हसणं
गालातल्या गालात
तुझं ते लाडीक लाजणं
नजरेच्या कोनाड्यातुन
अलगद बघणं
अन..माझं ते
अगदी सर्व विसरणं
तु नसताना
ह्यातलं काहीच घडत नाही
शब्द माझे कातर होतात....
उगाच मनास पंख देतात....
वेळी-अवेळी तुझ्यापाशी...
माझ्या मनाला खेचुन नेतात...
असे होऊ नये...असंही
कधीच मनाला वाटत नाही...
सये तु नसताना घरी....
आजकाल.......
खरोखरचं करमत नाही

ओंकार

Friday, February 10, 2012

"सई"ची कविता...



आजकाल "सई"ची चर्चा...
जागोजागी होऊ लागलीय...
कधी नव्हे ती माझ्या चक्क
कवितांतही दिसु लागेलीय

माझ्या कवितांतली माझी "सई"
बरेचदा माझ्याच मनात असते...
अन तिच्यावरच्या कविता वाचुन...
एकांतात मनसोक्त हसत असते

"सई" तु समोर आलीस..की
माझेच शब्द माझ्यावर रुसतात
नसतेस समोर तु जेंव्हा जेंव्हा..
तेंव्हा श्रावणसरींसम ओघळतात...

"सई" रुप तुझे चंद्रासम..
अन चांदण्यासम दुधाळ काया...
तुझा शोध न घेता मी...
जन्म खुळे जाईल वाया...

त्या आकाशाच्या निळाईने
सागरापाशी..ओंजळ पसरावी...
माझी "सई" मला त्या..
उगवतीच्या किरणात सापडावी

ओंकार

Tuesday, February 7, 2012

"सये"...पुन्हा तु नसताना

शब्द माझे अपुरे होते...
आज सये तु नसताना...
माझाच "मी" अधुराच...
"सये"...पुन्हा तु नसताना

फुलतो निशीगंध सये..
वेड्यागत तु असताना...
रुस ला तो आज माझ्यावर
"सये"...पुन्हा तु नसताना

खिळतो तो चंद्रमा नभांत..
तु चांदण्यांत त्या भिजताना..
टाळतो..वाट माझ्या गावाची..
"सये"...पुन्हा तु नसताना

घुटमळतो पावलांत काळ सये
मिठीत तु माझ्या असताना..
भिरभिरतो पारवा वाट पाहाता..
"सये"...पुन्हा तु नसताना

याद तुझी..खुणावणारे...
साद तुझी..बेधुंद करणारी..
सारं काही...आठवतेय..
अगदी ...अगदी ठळकपणे..
अन जाणवतेय...ते..
तुझ्या माझ्यातले अंतर...
"वाढलेलं"....किंवा वाढवलेलं
"सये"...पुन्हा तु नसताना

ओंकार

Wednesday, February 1, 2012

बहुदा...राहुनच गेलं ..



ठरवले होतं आपण
स्वप्नांना मुर्त रुप द्यायचं
अनेकानेक रंगानी..
आयुष्य उजळुन टाकायचं
पण..स्वप्नांना बांधायचं.
बहुदा...राहुनच गेलं ..

तुला दिलेलं प्रत्येक वचन
माझे श्वास त्याला तारण होते
श्वासांच्या ध्यासात अडकुन
मी मात्र स्वतःलाच फसवले होतं
हाती उरलेले श्वास मोजण्याचं
बहुदा...राहुनच गेलं ..

तुझ्या अदांना शब्दांत गुंतवत
मी कविता करतच होतो...
त्याच कवितांच्या मैफीलीत
स्वतःला मात्र विसरत होतो..
मैफीलीत भैरवी करण्याचे
बहुदा...राहुनच गेलं ..

श्वासही सरले..ध्यासही सरले...
हातात फुटके स्वप्न उरले...
डोळ्यांत खुपणारे...बोचणारे
भंगलेल्या स्वप्नांना वेचताना
थोडं स्वतःसाठी जगायचं
बहुदा...राहुनच गेलं ..

ओंकार