Saturday, March 26, 2011

उनाड कविता...(रि- एडीटेड)

वर सुरीय तापला, खाली धरनी तापली,
सारं उदास उदास, एक माय ती रडली

घोटभर पान्यापायी, ती गावभर हिंडली,
पाटलाच्या दारापाशी दोन क्शन ती थांबली.

आठवण पोटच्या गोळ्याची तीया मनात दाटली,
पाजायाला पानी त्याले ती गावभर हिंडली

पाटलाच्या घरामंदी सदीचा शिमगा,
आम्हा गरीबाच्या घशात फकस्त वैशाख वणवा

पाटलाच्या घरी माठ भर पाणी रायते...
त्याची इहीर बी बरी भरली काठोकाठ.

कारट पाटलाचा खेळे बघ खेळे पाण्यामंदी
माया तान्हुल्याची मातर आग होई अंगी

नाही मोल त्याले त्या घोटभर पान्याचे
माया कानात गुंजते ते रडने पोराचे

पाटलाच्या उसात वाहे ते विहीरीचे पानी
माया बाळ्याच्या डोळ्यांतुन टिपं गळतं बी नायी..

इहीरी गावातल्या आटल्या...नदी नाले बी सुकले.
पावसाची वाट बगत डोळे आभाळी लागले..

आभाळात् नायी पानी...जमीनीत नायी पानी..
नायी कुठेबी तरीबी....डोळ्यातुन का वाहे पानी

करुन धीर ती माय पाटलीनीला बोलली...
माझा कान्हा तुझ्यापरी..तहानलेला आहे घरी

थोडं तरी पानी मला मिळेल का गे माये
पीन्यापायी पानी माझा कान्हा वाट पाहे

थोडं घेऊन पानी ती खुशीत धावली.
उचलाया बाळाला ती माय आज चालली...

घरी जाऊन तीने बाळास पुसले...
माझे तान्हुले आज गप्प कश्यापायी बसले...

काय बोलेल तीजला तो निरागस बाळ...
ओढ पाहुन आईची दाराबाहेर थांबला तो त्याचा काळ...
आज थांबला तो काळ

ओंकार

Friday, March 25, 2011

सखी

येशील सये कवेत तेंव्हा
कळेल तुला गुज मनी ह्या लपलेलं..
शब्दांत करुनही व्यक्त कित्तेकदा..
खोल मनांत लपलेलं..

तुझ्या आश्वासक मिठीची
साथ सये जेंव्हा लाभेल..
खोल उरातील वादळालाही...
सागराची ती शांतता लाभेल...

तुझ्या -हुदयाच्या प्रत्येक ठोक्यावर,
सये माझेचं नावं असेल...
एकांतात शोधुन बघ कधीतरी...
कोणीच नसले समोर तरी मीच दिसेन... मीच दिसेन...

पुसटसे होणारे...अंतर दोघांमधले...
क्षणाक्षणाने मिटत जाईल...
तु बिलगशील मला अशी की...
त्या क्षणाचेही सोनं होईल....

ओंकार

Sunday, March 13, 2011

माझी ओळख...


माझी ओळख...
मी तोच....
तुझ्याच...हो तुझ्याच...
खोल मनांत रुजलेला...
अंकुरलेला...अन बहरलेला....
अन...तसाच...
कायम राहीलेला...
कधी आठवांत...
कधी...तुझ्या ओठांवर
रेंगाळलेल्या 
त्या माझ्या कवितांत....
शोधावं नाही लागणार...मला
अन माझ्या अस्तित्वाला...
मी कायमच तुझ्यात असेन....
तुझ्या -हुदयाची स्पंदने बनुन..
बघ...प्रयत्न करुन बघ .एकदा..
मला तुझ्यात शोधण्याचा...
बघ...अग वेडे...
तुला तुझ्या -हुदयात मीच दिसेन...
त्या तुझ्या खुळ्या स्वप्नांतही...
मीच असेन....
बघ..नक्कीच मीच दिसेन

ओंकार

Wednesday, March 9, 2011

जतरा

आकाशाकडं ड्वाळं...लागलं...
कधी पाऊस यनारं...
म्या प्येरलेल्या धानाला...
यंदातरी क्वोंब येनारं...
आये...घाबरु नगं...
म्या गावाकडल्या जतरेला जानार
काळं ढगं दिसुदे...
आता उन सहन व्हुत नायी...
दुपारच्या उन्हात घराकडं येववत पन नायी..
आये...बेगीन कर पाऊस 
आता धरनीमाय तानली..
फाड्युन त्वांड वर बगाया लागली...
पिकं आलं..की म्या..पोटभर ज्येवनार...
त्या सावकाराचा पैकाचा मी परतावा करनार...
म्या गावाकडल्या जतरेला जानार
त्या कोंबड्याचा जिंदगीवर...
देवी खुश व्हुनार..
अन मग तीच्या ह्या लेकराला
भरभरुन पिकं देनार...
माझी जिंदगी सुधारन्यापायी...
ते कोंबडं मातर जिवानिशी जानार...
म्या गावाकडल्या जतरेला जानार

ओंकार

पारखाच मी

पारखाच मी...
तुझ्या आठवांत..
पारखेच भास..
सये तुझे II

राहाशिल तु...
आठवांत माझ्या...
शब्दांत अनाहुत
दिसशील तु II
 
कोसळला मेघ
पाहुनीया सारे...
शब्दांचे इमले
क्षणीक ठरले II

आयुष्य स्तब्ध...
राहुनीया गेले...
अन मग उरलो...
माझा मीच II

एकटाच होतो..
एकटाच आहे...
एकटाच जाईन...
पडद्याआड II

ओंकार

Tuesday, March 8, 2011

पाषाण

पाषाणवत मी....
त्याच...
कोनाड्यात थिजलेला..
भर पावसांतही एकटाच...भिजलेला...
अश्रु दाटले डोळ्यांत परी...
चिंता त्याची नाही....
मी....त्या तुफान वादळवा-यातही
शांत निजलेला...
अस्तित्व माझे..
त्याच दगडावरच्या रेघेसारखं...
क्षणांक्षणांत पुसट होणारं...
अन मग उरेन कदाचित बाकी...
त्याच्याच मनावरचा
पुसटसा व्रण बनुन
ओंकार


काळजाचे घाव.

काळजाचे घाव...त्या को-या
कागदांवर अगदी नकळत उमटतात...
त्या को-या कागदांनाही मग..जणु...
विचारांचे पंख फुटतात...

आता दिसही सरला..
रातीला बहर येईल...
तुझ्या खुळ्या आठवांचा..
मनामध्ये पुर येईल

प्रेम...प्रेम...अन प्रेम...
प्रेमाआधी नी नंतर काहीच नाही...
असं मुळीच नसतं..
त्याधीच्या काळातचं...एक चुकार मन...
त्याचं हक्काचं आभाळ सजवतं...



ओंकार

जुनं पुस्तक....मोगरा...अन..सखी..

त्या जुन्या पुस्तकांच्या 
काहीश्या जिर्ण पानांवर...
कधीकधी....आठवांचे मेघ दाटुन येतात..
कधी त्या वाळलेल्या गुलाबात....
कधी त्या जाळीच्या पिंपळपानात



पुस्तकं...अन मित्र...
दोघेही तसलेच...
कधी...डोळ्यांत पाणी आणणारे..
अन कधी मायेने कुशीत घेणारे...



शब्द...त्या जुनात पुस्तकांतले...
काळानुरुप...फिक्कट होत जातात..
बंध मोग-याच्या फुलाच्या गंधातले...
हळुवार विरळही होत जातात....



धुंद करुन जाऊदे...वातावरण
आज त्या मोग-याच्या गंधाला...
कदाचित देईल साद...तो आज...
माझ्या खुळ्या सखीला...



ती माझी सखी...
स्वप्नातच..सांडलेली....
जशी त्या चंद्राची चंद्रकोर...
पुनवेच्या रात्री शोभलेली...



तो पुनवेचा चंद्र नभी...
अन माझ्या समोर तु...
त्या चांदण्यात न्हाऊन..
चंद्राला नभांआड लपायला लावणारी...



त्याच वाळुवर उगाचच रेषा ओढताना...
तुझ्या चेह-यावरुन नजर हटायची नाही....
लोकं म्हणायचे...की वेडा झाला प्रेमात...
पण...खरं तरं त्या गही-या डोळ्यांतली ती गुढ भाषा...
मला कधी उमगलीच नाही...



प्रेम...असेलही कदाचीत..
पण...ते कायमच अव्यक्तच राहीलं..
तुझं माझं ते अल्लड नातं..
नेहमीच...कायम गुमनाम राहीलं





ओंकार

आरसा





तुटणे...तोडणे..
हा तर मानवी स्वभाव...
प्रत्येकानेच...एक न दिवस...
एक आरसा फोडलेला...
कधी काचेचा....कधी मनाचा..



एकाला तुटण्यात धन्यता..
अन दुस-याला तोडण्यात...
तोडणारा...अन तुटलेला....
दोघेही एकसारखेच..
सर्व काही मिळुनही...सर्व काही गमावलेले..




एकाच्या -हुदयावर व्रण..
दुस-याच्या हातांवर...
अन..काळ पुढे सरकल्यावर....
त्या जखमेच्या खुणाही....तश्याच हरवलेल्या...
कुठेतरी धुळीत...उगाचच...


ओंकार

आठवांचा प्याला...

आकंठ आठवांचा प्याला...
मी त्यात स्वतःला विझवले...
अन मग...जगायचे...सत्यात...
कुठेतरी राहुनच गेले..



त्याच खुळ्या आठवणी..
अन त्यांचा तो पाठशिवणीचा खेळ...
आभास..अन भासांचा...
कधीच जुळेल का तो मेळ..



कायमच धावायचे...
कधी सावल्यांच्या...कधी स्वप्नांच्या....
सत्यातलं..जगणं...
ते मात्र तसचं...धावता धावता क्षितीजापार राहीलेलं..



सारं जगं..माझ्याविरुध्द..असतानाही....
माझी ती कायमच प्रवाहाविरुध्द चालण्याची तगमग..
अन ते क्षितीज कवेत आलेयं..असं.
वाटतं होतं...अन तितक्यात...सारं संपुन गेलं...



ओंकार

Friday, March 4, 2011

अट्टहास जगण्याचा.....

त्यादिवशी काही कामासाठी मस्जीदबंदरला गेलो होतो...तिथुन ट्रेन साठी जात असताना टँक्सीवाल्याने टँक्सी एका रोडवरुन आणली..सहज म्हणुन आजुबाजुला पाहीलं...तोच तो मुंबईचा रेडलाईट एरीया..आजवर चित्रपटात खुपदा पाहीलेला..एकंदरीत ते चित्र पाहुन जे काही वाटलं...तेच लिहीण्याचा प्रयत्न करतोय..
ओंकार
=====================================================
अट्टहास जगण्याचा.....    


नुसतं सौंदर्याची
नुमाईश करत राहायचं...
कधी स्वतःला तर कधी
दुस-याला सावरायचं...
नुसता नेत्रकटाक्षही पुरेसा
कोणालाही वेडं करायला...
सारा नजरेचा खेळ....
मनाचं काय?
जाऊदेना....
तो विचारचं नको...
नाहीतर मनासाठी कुठे काय चाल्लय?...
चाल्लय ते दोन वेळेची भुक.....
बस......
कोणासाठी ऐश्वर्या...कोणासाठी मल्लीका..
तर कोणाच्या स्वप्नातली परी
त्यांना माझ्या मिठीत गवसली....
त्या देवदासांसाठी होऊन चंद्रमुखी...
मी माझ्यातल्या त्या मलाच...
पहील्या रात्रीतच संपवली...
खेळ झालायं माझ्या आयुष्याचा…..
अन मी खेळणं नशीबाचं....
मन असेस्तोवर खेळायचं
अन मग मन भरले की
फेकुन निघुन जायचं ....
पुन्हा एखाद्या कोनाड्यात....
मी...आजही तशीच...
पुन्हा आज रात्रीही
थोडं मरण्यासाठी...
दाराकडे डोळे लाऊन बसलेली....
निदान आजतरी
माझ्या पोटात दोन घास जातील
ह्या आशेवर....
पण त्याची तरी शाश्वती कुठेय?
बस....तरीही
अट्टहास....जगण्याचा.....


ओंकार
        

Wednesday, March 2, 2011

गंध...

भर पहाटे...तो शुक्रतारा..
आभाळात चमकलेला...
अन नभांत गुंतुन तो चंद्र
आज बहुदा अडखळलेला
आभाळ गोंदुन तळहातावर...
तो चंद्र आल्यापावली निघुन गेला...
जाता जाता तो त्याची खुण म्हणुन...
एक चांदणी...अंगणात टाकुन गेला.
अंगणात...तशीच पडलेली ती चांदणी..
मुक्यानेच का साद देत होती....
त्या अंगणात बहरलेल्या रातराणीशी...
जणु ती मनातलं बोलत होती...
त्या सरत्या रातीसह..
रातराणीचा दरवळता गंध...
अन त्या गंधात वातावरण
तसेच अनामिक धुंद...

ओंकार

सावल्यांचा खेळ...

सावल्यांचा खेळ...
अजब निराळा....
मुठीत.. धरलेला एक क्षण
असाच पळणारा 
ते मुठीत धरलेले श्वास..
अन पायाखालची सावली..
ह्यांचं नात कायमच
अनामिक राहीलेलं...
एकाच्या मागे लागलं...
की दुस-याचं अस्तित्व...
क्षणांत हरवलेलं...
क्षणांत फसवे..
भास...अन आभासही तसले 
सारे काही सोडुन दिले...
ते माझे श्वासही फसवे

ओंकार

Tuesday, March 1, 2011

म्या पण साळेला जाणारं..

आजचं म्या ठरवलं..
म्या पण साळेला जाणारं..
माझ्या भावावानी...
म्या पनं..मोठी व्होणारं...
त्या गावातल्या पोरींसंगाती..
आज म्या दीसभर खेळणार..
नको तो खटारा सदीनाचा भांड्यांचा..
आज म्या बिगी बिगी सावरणार..
ए आये आज मी दादावानी
साळ्येला जाणार...
अग कारटे..
साळ्येला जाऊन कुनाचं भलं व्हुनार?
मी शेताला चाली..
मग भाकर पिठलं...कोन बनवनार?
म्या बाहेर पन बघाचं..नी घरी पन?
काय साळ्येला जायाचं नाही..
बस गुमान इथ्येच ...
आयी बापानं..
मला जाऊच दिलं न्हायं..
पनं म्या आज साळेला जाणारं..
साळ्येला जायाचं सपान माझं...
सपानचं राहुन गेलं...
तेच कायमच धुनं...
पुन्हा माझ्याच नशीबी आलं.

ओंकार..

भाषा थोडी गावाकडची लिहीण्याचा प्रयत्न केला आहे...अन तसा संबंध नाही माझा ह्या भाषेशी...तरी काही चुकले असल्यास सांगा...पुन्हा कधी तरी लिहीताना नक्की उपयोग होईल