Monday, July 25, 2011

‎"Reboot"

बस..आयुष्य ..संपलयं सारं..
कोणासाठी? कश्यासाठी...
अजुन किती काळ?
बस झालं यार...खरचं पुरे झालं..
आता सहनच होतं नाही...
तुझा माझा विरह..
कित्तेक दिवस लोटले
तरीही मी आजही तिथेच...
तुझ्या परतण्याची वाट बघत...
उगाचच...ठाऊक आहे
की तुझे परतणे आता अशक्य आहे..
तरीही वेडे मन जुमानत नाही..
सारं काही संपलयं..
हेच समजवायचं मनाला.
अन...पुन्हा नव्या डावाला सुरवात..
एक नवं ध्येय...नवं स्वप्न...
बस आता ठरवलयं..
आयुष्याचे Ctrl. + Alt. + Del
बटन दाबायचे...अन करायचे त्यालाही
Reboot.

ओंकार

Thursday, July 21, 2011

सखी...



त्या निळ्याशार आभाळाच्या साक्षीनं..
खुललेलं प्रेम...तुझं नि माझं..
अन...अलगद...मारलेली..मिठी...
अगदी कोणाच्याही नकळतच...


नकळतच नजरेला मिळणारी..नजर...
अन उगाच कावरीबावरी झाल्यासारखी तु...
तुझी शोधक नजर, 
सतत शोधत असल्यासारखी..
अन मी मात्र तुझी गंमत पाहाणारा


नजरेच्या कोनातुन नकळतच
माझा वेढ घेणारी ती"
अन मी मुद्दाम लपुन
तिच्या नजरेत न येण्याचा
प्रयत्न करणारा


मोहोरलेल्या मनातलं..
स्वप्न नव्याने अंकुरलेलं..
अन..प्रत्येक श्वासांसोबत.."आयुष्य"
पुन्हा एकदा..अनुभवलेलं


ओंकार

Wednesday, July 20, 2011

कोलाज

आयुष्याची लक्तरांत..
तशीच स्वप्ने सजवलेली..
बहुदा...फाटक्या ओंजळीतच
इंद्रधनुष्य अवतरलेली..
भिजलेलं चांदण..
अंगणात अंथरलेलं..
अन..मनाचं काय?
ते त्याच... कोलाजच्या
हरवलेल्या चित्रांत..
कुठेतरी गुंतलेलं

ओंकार

माझ्या आठवणींनी...

आकाशात टिमटिमणा-या चांदण्या..
त्या रातराणीचेमदहोश करणारे गाणं..
ति दुरवर कुठेतरी थरथरती वात...
अन..तशीच अंगणात मोहोरणारी तु..
माझ्या आठवणींनी...


रात्रीच्या रंगमंचावर एक एक अंक सरणारा.
अन चंद्र...बेभान होऊन बरसणारा.
आपल्या उदरात गावास घेणारं धुकं..
त्यातही...बासरीची तान होऊन गुंजणारी तु...
माझ्या आठवणींनी


पहाटे गवतावर अलगद पहुडलेले दवबिंदु..
दवबिंदुंनी ओल्या वाटेवर उमटलेली पाऊले
दुरवर कुठेतरी कोकीळेचं वेडं लावणारे कुजन..
मला आठवत भुपाळीचा राग आळवणारी तु..
माझ्या आठवणींनी...


ओंकार

Tuesday, July 19, 2011

समांतर क्षितीजे

कोमेजलेल्या मनाने कात टाकण्याची..
अविरत वाट बघणारी मी...
आजही तु मागे फिरशील ह्या खुळ्या आशेवर..
तुझ्या वाटेकडे डोळे लावुन बसलेली...
आजवर अनेकदा...ति वाट...
मनास पंख लावुन गेली...
अन डोळ्यात तुझ्या माझ्या मिलनाची
स्वप्ने देऊन गेली
तु मात्र काही आला नाहीस..
पण तरीही... नक्कीच आठवले असते मी तुला ..

एवढे दुर क्षितीजापार का निघुन गेलास ?
की तुला परतणेही कठीण जातयं
पण त्याने काय होईल? हा प्रश्न कायमच उभा...
माझ्यावर हसत...माझ्या थिटेपणावर..
सोबत जगण्याचा आणाभाका...
त्या जगाशी लढण्याची तयारी..
सारं काही खोटं होतं?...बहुतेक..
तु...अन मी...आपण दोघेही...
एका अनामिक नात्याने एवढे घट्ट विणले गेलो..
की आता तु नसताना सोबत.. जगणे अशक्य होतयं..
पण तरीही... नक्कीच आठवले असते मी तुला ..

धडाडणारा प्रत्येक श्वास मला प्रश्न विचारतोय...
तुझ्या जगण्याचे ध्येय काय?
डोळ्यांतुन ओघळणारा प्रत्येक अश्रु विचारतोय...
माझ्या निखळण्याचे कारण काय?
चिमटीतुन अलगद निसटणारा प्राण विचारतोय...
कश्यापायी....जगायचं?..कोणासाठी​....???
कोण तु?....माझ्या भावनांशी खेळुन..
काय मिळाले तुला?
मला तुझ्या आधाराची सर्वाधिक गरज असता...
पाऊल वाट टाळुन...दिसेनासा झालेला तु,,,
अन तरीही मी मात्र अजुनही तशीच...
तुझ्यावर प्रेम करणारी...
पण तरीही... नक्कीच आठवले असते मी तुला ..

मन अजुनही मानायला तयार नाहीय...
की तु दगा केलायस..फसवलेयस मला...
कारण...माहीत नाही..का? तेही माहीत नाही..
पण एक मात्र खरे..
की आता तुझी माझी वाट जुळणे अशक्य आहे..
कारण आता आपण,
दोन समांतर क्षितीजांवर चालतोय..
एकमेकांना टाळत...अन...मी तशीच अश्रु गाळतं
"आज तरीही नक्कीच आठवले असते मी तुला ..."
पण आता कळतेय
की दोन समांतर क्षितीजे कधीच जुळत नाहीत
ओंकार

(दिनांक 19/7/2011 वेळ सकाळी 8.40 )
(सदर Theme मला माझ्या एका हर्षाली नावाच्या मैत्रीणीने सांगितली होती..So...Credit Goes To Her)

Saturday, July 16, 2011

‎"नाद"



"नाद"

मज लागलेसे ध्यान।आज त्या कानड्याचे..
मुखी सदा विराजेल।नाम आज सावळ्याचे
विटेवरी राहीलासे उभा।विठु जन्मोजन्मांतरी
तिन्ही जगताचा स्वामी।हात कटीवर धरी

चंद्रभागीयेच्या काठी।जमविला तये मेळा..
माझा विठु तु खुळा। खेळे जन्मोजन्मांतरी
हाती भगवी पताका।वारकरी हो चालती
तु होऊनी सावली।माया दावी तयांवरी

पायी पालखी चालली।मने खुळी ती हर्षली
तुझ्या चरणी अर्पिली।मी ती फुलांसम
वर तापेल वणवा।जरी येईल तो ज्वार
तुझ भेटीस माझे। माये आतुर हे मन

भेट त्वरेने तु जना। बापा संगे रखुमायी..
ज्ञाना मुक्ताही पातली।बघ तुझ्या हो मंदीरी..
संगे तुकोबांचा शोभे।तव कळस हो शिरी
मेळवुनी मेळा ।पांडुरंगा राज्य करी

नाद घुमेल "ओंकार"।संगे टाळ चिपळ्यांचा
पाऊले धरती वाट।तुझ्या सोनीयाच्या पंढरीची
नाही आस रे सोन्याची।वा मज रे माणीकांची..
तुझा हात माथ्यावरी।देवा जन्मभर धरी

ओंकार

"ह.भ.प.अमितानंद सरस्वती" ह्यांनी काही चुका निदर्शनास आणुन दिल्या होत्या...त्यात बदल करुन पुन्हा एकदा सदर कविता पोस्ट करत आहे....

चुकभुल द्यावी...

ओंकार


अश्या फॉरमँटमध्ये मी कधीच काही लिहीलेले नाही...अन हे देखील कसे काय सुचले नाही माहीत...बस कालच मी एक पोस्ट टाकला होता ना की त्याच्या मनात जे काही येते तेच आपण लिहीतो...बहुतेक त्याचेच प्रत्यंतर दिलेय त्याने...

तरीही पहीलाच प्रयत्न असल्याने काहीही अनावधानाने चुकले असल्यास चुकभुल द्यावी....
ओंकार

Friday, July 15, 2011

इंद्रधनु

आयुष्यभर ओंजळीत जपलेलं स्वप्नं..
अलवार..पहील्या पावसात उमलुन आलं..
अन...त्याच श्रावणसरीत अनाहुत..
तुझं ...माझं नतं खुलून आलं..
पहिला पाऊस...पहिलाच थेंब...
पहिलाच होकार...पहिलचं प्रेम
सारं काही..अगदी स्वप्नवत...
अन नकळत काढलेला चिमटा
मीच...मला...
अन..मग तुझ्या त्या गही-या डोळ्यांत
माझं हक्काचं आभाळ मला सापडलेलं..
अन ...त्याच गही-या डोळ्यांत...
एक स्वप्न माझ्या ओंजळीतलं..
इंद्रधनु झालेलं

ओंकार

Thursday, July 14, 2011

वही

तिला कंठ फुटला..तेंव्हा...
श्रावण सरुन गेला होता...
अन सुचले मिलन गीत जेंव्हा..
तेंव्हा बहुदा...
मोगराही वहीत वाळला होता
वहींच्या पानांवर अजुनही दिसतात
त्या सुकल्या मोग-याच्या खुणा,
अन सांडुन जातात नकळत पापण्यांत..
त्या तुझ्या मिलनाच्या आठवणी जुन्या
आयुष्यभर वही भरत राहायचे...
बेरीज वजाबाकी करत...
अन शेवटच्या श्वासासोबत कळते..की
पानच नाही तर वहीच चुकीची होती

ओंकार

आठवणी...कोमेजलेल्या

जुन्या..नव्याच्या वादांत...
आठवणी मात्र कोमेजुन गेलेल्या..
अन...मग पुन्हा एकदा वाद..
कोणाचे चुकले...अन काय?..
सा-या वाटा मागे फिरण्याच्या..
क्षितीजापार हरवुन गेलेल्या
काही कटु आठवणी...
शब्दांत गुंफुन कित्तेकदा मी
सर्वांत वेगळा राहीलेला...
अन मग हसरा मुखवटा लावुन
चेह-यावर मी कायम हसत राहीलेला.
तु..चिंब होऊन भिजलीस..
तेंव्हा तुझ्या बटा सावरणारे
हात माझेच होते..
तु सोडुन गेलीस वाट अचानक..
तेंव्हा..आभाळातुन...अनिर्बंध
बरसलेले डोळे माझेच होते
ओंजळीतुन वाळु अलगद निसटावी..
तसे शब्द शब्द...रिते होणारे...
अन ...नंतर मीच सांडलेला..
नि:शब्द होऊन...शब्दांशिवाय...
घडुन गेलेला इतिहास...
तसाच उगळुन उगळुन संपुन गेलेला..
अन मी..
तुझ्या आठवांवर कविता लिहीताना..
असाच सहजच विस्मरणात गेलेला
अगदी कोणाच्याही नकळतचं.....

ओंकार

अर्थ

माझ्या -हुदयाच्या...प्रत्येक स्पंदनावर...
सखे आता तुझंच नाव असेल...
अन...माझ्या प्रत्येक कवितेत...शोध...
निदान एकदातरी तुझे नाव दिसेल..

पुन्हा त्या सरोवराच्या ...पाण्यात
वारंवार तुझं...प्रतिबिंब दिसेल...
एक बट मुद्दाम सोड सये...गालांवर..
नाहीतर...तो नभीचा चंद्रमा ..लाजेल

सावर...सखी आवर मला..
आज बहुदा -हुदयाचा एखादा ठोका चुकेल...
बघ..शोधशील कदाचित खुळ्यासारखी मला...
जेंव्हा..माझ्या कवितांचा अर्थ वेडे तुला कळेल

ओंकार

शाश्वती

न्यायदेवते...
तुझ्या डोळ्यावरची पट्टी लवकर उतरव...
ह्या साल्यांना अशी भर चौकात शिक्षा कर
की पुन्हा मुंबईकडे बघण्याची हिंमतच व्हायला नको...
सालं...नेहमीच झालयं...
की कधी कुठे बॉब फुटेल
अन विझवुन टाकेल आयुष्याची वात...
सारेच भयानक...
अन डोळ्यांसमोर दाटलेलं तांडव...
कोणाचे आयुष्य संपवलेले....
कोणाचे लचके तुटलेले..
ह्या साल्यांना नक्की साधायचयं तरी काय...
कोणी सांगेल का?
नक्की अजुन हवय त्यांना काय?...
सकाळी कामाला बाहेर पडणा-याच्या जिवाची..
का स्वतःला परत येण्याची शाश्वती नाही..
का? इतका स्वस्त झालयं मरणं...
आयुष्यापेक्षा...जे फुकटात वाटले जातेय...
खरचं सांगु
तर अजुनही हात थरथरतायत....
आज संध्याकाळची मिटींग होती दादरला...
जाणार होतो...
जिथे स्फोट झाला
त्याच्या बाजुच्या बिल्डींग मध्ये
पण..काल संध्याकाळी अचानक..
काय मनात आले...
की घरी आलेला परत गेलो..
अन काम करुन आलो..
का?
कारण त्या सिध्दीविनायकालाच माहीत.....

ओंकार

स्पर्श...

तोच ओघळता स्पर्श...
निघता निघता नकळत झालेला..
अन गज-यातील दोन कळ्या खुडुन
तु दिलेले वचन...पुन्हा भेटण्याचे
तुझी...मिठी...
तुझा तो थरथरता स्पर्श...
अन वा-यासोबत भुरभुर उडणारे..ते केस..
अन..त्यांना सावरणारी तु....
अन त्याक्षणी...
तुला नजरेत भरुन घेणारा मी..
माझ्या मिठीत सर्वस्व
विसरुन विरघळलेली तु..
अन...त्याक्षणाचा बोभाटा
करणारा अख्खा गाव...
किती पराकोटीचा क्षण.तो

ओंकार

फोलपटं

वेदना..त्या मोग-याच्या...
वाळलेल्या पानांसोबत वाळुन गेल्या..
अन...वाळतानाही वहींच्या पानांवर
नकळत..दुःख मागे सांडुन गेल्या
ओंजळीतलं सुख..
कायमच खुणावत राहीलेलं...
अन.मग प्रत्येक शब्दांत कवितांतल्या..
माझं प्रेम भरभरुन वाहीलेलं
खरचं...काळासोबत...आठवणींचा​ दर्प..
फिक्कट होत जातो...
अन मागे उरतात...त्या...
वाळलेल्या आठवणींची फोलपटं
माझी ओळख...आयुष्यभरासाठी बनतील
माझ्या त्याच अबोल कविता...
त्याच चारोळ्या...सारं काही बोलतील
मी असताना...मी नसताना...

ओंकार

ती नक्की कशी असेल?

"ती" तशीच...कायमच मोरपंखी
स्वप्ने डोळ्यांत सजवुन ...वाट बघणारी...
अन.."तो" समोर आल्यावर उगाच...
मैत्रीच्या आणाभाका घेणारी

त्या शुभ्र धुक्यात न्हालेल्या
क्षितीजाआडुन कायम खुणावणारी
समोर न येताच..नकळतच..
जादु...अनामिक करणारी,

त्या नभांतील श्रावणसरीप्रमाणे
निर्झर अवखळ बरसणारी..
त्या रानातील रातराणीसारखी
दर्प मागे सांडुन दरवळणारी तु

कोणी सांगेल का? ती खुळी कशी असेल..
मी समोर आल्यावर...ती हसेल..?
की मनातलं सारं..लपवुन ती गप्प बसेल..?
कोणीतरी सांगा यार...ती नक्की कशी असेल?

ओंकार

"रिसायकल बिन"

नेहमीचे "रुटीन"...
काम काम नी काम..
आयुष्यभर तेच चालायचे...
अन...श्वास मात्र
"आऊट ऑफ द बॉक्स" जाऊन...
हरवुन गेलेले
असेच "अनएस्पेक्टेड" सारं..
बरेच काही "रिझल्ट अनक्नोव्न"...
अन आयुष्याच्या शेवटी काय....
तर "डेस्टीनेशन अनरिचेबल".
सगळे काही "मँनेज"
करण्याच्या नादात...
बरचं "अनमँनेज" राहीलेलं..
अन मी मात्र षंढासम...
त्याच..."रिसायकल बिन" मध्ये
रिसायकल होण्याची वाट बघत.

ओंकार

Wednesday, July 13, 2011

सोहळा नभीचा...

मनात दाटला..
आज पाऊस कधीचा..
उगाच जाहला...
कोंडमारा मनीचा..

नकोत..उसासे..
त्या कोवळ्या दवाचे...
तिमीरात सांडला..
चुराडा चांदण्यांचा..

धावतो मी उगाच...
होऊनी मंत्रमुग्ध
कधीच सापडेना...
का? ठाव मृगजळाचा

अद्याप अपुरा..उभा
निशीगंध अंगणी
मागेल दान त्यापाशी
तो सोहळा नभीचा...

मागेल दान त्यापाशी
तो सोहळा नभीचा...

ओंकार