Monday, January 9, 2012

तिची माझी भेट



तुला खुणावता तो मंद गंध
खुणावता वेडावता मोग-याचा..
अन तोच तुझा भास..आभास..
पुनश्छ ध्यास लावी जगण्याचा

बस एकदा तिनं हसावं..
फक्त एकदा तिनं हसावं..
भरलं आभाळ चांदण्याचं
क्षणार्धात माझ्या कवेत यावं

तो घरामागचा गुलमोहोर..
आजकाल बहरत नाही..
तुझ्या वाट बदलुन जाण्याचे
कारण त्यालाही कळत नाही

स्वप्नांतल्या वाटांना..आज
नव्यानेच तिचीच याद यावी..
अन बागेतल्या त्या कळ्यांनी..
तिला आता  कुठवर साद द्यावी

गावाबाहेरच्या त्याच निसरड्या वाटा..
जेथुनी कहाणी आपली सजली होती...
रातराणी आज तुझी बघताना वाट..
खरचं बघ ना..आज दमली होती.

तिची माझी भेट ठरलेली कधीचीच
भेटल्यावर तिचीही घाईही नेहमीचीच
ते तिचे नेहमीचे बहाणे..घरी परतण्याचे..
सांगावे तिला कोणीतरी..सखे तुझ्या
पैंजणात सजलेत माझे श्वास जगण्याचे

असचं काहीसं घडावं

असचं काहीसं घडावं
थोडं थोडं का होईना
तिला माझ्या मनातलं
अगदी सगळं कळावं
खरचं असंच काही घडावं

मी टाळावं बोलायला..
तिला सगळं काही कळावं
अन न बोलताचं दोघांचं
मन नेहमीच जुळून यावं
खरचं असंच काही घडावं

उगाचं लाजतचं..तिनं
हलकेच मिठीत शिरावं
मिठीत शिरताना मनाचं
भिरभिरणारं मोरपिस व्हावं
खरचं असंच काही घडावं

एकदा तरी का होईना.
तिनं माझ्याशी भांडावं
भांडुन झालं मनसोक्त की..
उगाच स्वतःवरच रुसावं
खरचं असंच काही घडावं

तिच्यावरचं प्रेम कवितांतुन
माझ्या नकळतचं तिला कळावं
कळल्यावर तिला ते सारं..
तिनेही मनसोक्त हसावं
खरचं असंच काही घडावं

निदान एकदातरी घडावं
निदान एकदातरी घडावं
माझ्या सखीच्या नात्याला...
काळानेही घट्ट करुन जावं
खरचं असंच काही घडावं

ओंकार

Sunday, January 8, 2012

संभवामी युगे युगे

भगवतगिता वाचत असताना एक नविन विचार मनास स्पर्शुन गेला की कान्हा असो वा कोदंडधारी प्रभु राम..दोन्ही अवतारात भगवंताने एका सामान्य माणसाला भोगावे लागेल ते सर्व भोग भोगले...अगदी आनंदाचे वा पार दुःखाचे क्षणही झेलले...जेंव्हा कुरुक्षेत्री युध्द सुरु होते तेंव्हा समोर आपले नातलग पाहुन अर्जुन काही क्षण कोलमडला..त्याने धनुष्य खाली ठेवले. त्यावेळी रथाचे सारथ्य करणा-या त्या युगंधराने पार्थाला श्रेष्ठ भगवतगिता सांगीतली..पण त्या मनुष्ययोनीत बहुदा काही क्षण कान्हाही निराश नक्कीच झाला असावा निदान दोन क्षणांपुरता का होईना कारण समोर उभे ठाकलेले जसे अर्जुनाचे गुरु..नातलग होते..तसेच ते कान्हाचेही होतेच की...तर त्या दोन क्षणांत बहुदा काय द्वंद उभे ठाकले असेल ते मांडण्याचा एक फक्त प्रयत्न कारण तसाही कान्हा हा सर्वाच्या पलीकडचा...अनंत असा..त्याचा आदी अन अंत कोणासही ठाऊक नाही...
चुकभुल दयावी ...
ओंकार

संभवामी युगे युगे

केवळ...काहुर..मनात..
विचारांच...प्रश्नांच...कश्यासाठी?...
अन मुख्य म्हणजे कोणासाठी..
सारेच रक्ताचेच भाऊबंध...
अगदी माझ्यासारखेच रक्तामांसाचे..
ज्यांच्या अंगाखांद्यावर खेळलो...
वाढलो..शिकलो...तेच ...तेच सर्व..
हा धर्म..की अधर्म..का? कळतच नाहीय..
धर्म अधर्माचा जालीम बुरखा.
चेह-यावर लावुन..
बेमालुम गर्दीत मिसळणारा..
मी युगा-युगांचा..युगंधर..
क्षणार्धात..कफल्लक झालेला...ह्या सा-याने...
काहीच कळत नाही..
जो लढतोय..तोच मी..
अन ज्याच्याशी लढतोय..लढणार आहे..
तोही माझाच मी..
सारे माझेच... अन सा-यांत मी..
सुन्न झालेलं डोकं.. दुमदुमणारी रणदुदंभी..
गर्जणारे शंख..अन सोबतच
नजरेस धुमील करणारा तो धुरळा..
रथचक्रांमुळे... उमटलेल्या रेषांसमवेतच...
अधोरेखीत झालेले..काही प्रश्न..
युध्द कश्यासाठी..? काय सिध्द करण्यासाठी..?
श्रेष्ठत्व? की.....
कश्याचेच उत्तर नाही....
पाठी हा पार्थ..अन समोर राधेय..
दोन्ही माझेच...प्राणांहुनही प्रिय..
एक 
ब्राह्मणवेशात
रानोवनी भटकलेला...
एक सुतपुत्र म्हणुन
आजन्म हिणवले गेलेला...
मी ही तसाच नाही का?
गोपाळ..गोकुळातला...
हताशपणे..हा अधर्मरुपी..अंधारात
अनाहुत हरवत चाललेला.. सुर्य..
सुन्न झालेल्या डोक्यांतुन..
ऐकु आलेले उत्तर….

"यदा यदा ही धर्मस्य
ग्लानिर्भवति भारत,
अभ्युथानम् अधर्मस्य
तदात्मानं सृजाम्यहम् |

परित्राणाय साधुनाम
विनाशाय च: दुष्कृताम,
धर्मं संस्थापनार्थाय
संभवामी युगे युगे
संभवामी युगे युगे

ओंकार

दरवळता गंध

मी न सांगताच..बरेचसं
तिला बरेचदा कळत होतं
बहुदा माझ्या कवितांत ..
तिचं माझं मन एकांतात
एकमेकांशी बोलत होतं
शब्द कधीचेच जुळले होते..
हेवेदावे पाठीमागेच सरले होते..
प्रेम अन प्रेम बस काय ते..
कवितांमध्ये आजकाल उरले होते
ती आली आयुष्यात अन..
सारं काही बदलुन गेले..
श्वासांचे गणीत देखील माझे..
काही क्षणांपुरते चुकुन गेलं
आजकाल उरलाय..फक्त
दोन मनांचा अनामिक बंध..
अन प्रत्येक कवितेंत माझ्या..
तिनं माळलेल्या
गज-याचा दरवळता गंध

ओंकार

Monday, January 2, 2012

भर पहाटे




त्याच पायवाटेवर..
अडचणीच्या.
निस्तेज..काळवंडुन
पडलेला मी..
भर पहाटे कोसळणा-या
दवाची वाट बघत...
पुन्हा एकदा चमकण्यासाठी..
ठाऊकच नाही…
ती चकाकी..शेवटची वेळ
कधी नजरेला पडली..
अन त्यानंतर,
सुरु झालेला संघर्ष
ओळख शोधण्याचा..
कोणी बोले मला कोळसा..
कुणी बोले
माखला चिखल जरासा..
ठाऊकच नाही कोणाला...
उरावर माझ्या आहे ठसा..
त्या राधेचा...
अन मिरेचाही..
विरक्त प्रेम...आतुरलेले...
अन निर्विकार प्रेम...
बहरुन आलेले..
दोन्ही 
पार जवळुन पाहीलेय मी..
झुरणं दोघींचेही... 
कान्हापायी...
तोच निळा कान्हा...
जणु साक्षात सुर्यबिंब 
निळं उत्तरीय लेवुन 
धरणीवर अवतरीत झालेलं..
अन तीच ती खुळी राधा...
दोघांच्या प्रेमरसात
आकंठ न्हालेला मी...
अन दुस-या बाजुस..
ती मीरा..राजपद सोडुन 
संन्यासी झालेली...
त्याच निळ्या कान्हापायी..
अन तिच्या भक्तीत भिजुन
शेंदुर लेपुन..
देवपदास गेलेला मी.
तोच तो दगड...
अडगळीतला...
विस्मरणात गेलेला...
भर पहाटे कोसळणा-या
दवाची वाट बघत...


ओंकार