Monday, January 2, 2012

भर पहाटे




त्याच पायवाटेवर..
अडचणीच्या.
निस्तेज..काळवंडुन
पडलेला मी..
भर पहाटे कोसळणा-या
दवाची वाट बघत...
पुन्हा एकदा चमकण्यासाठी..
ठाऊकच नाही…
ती चकाकी..शेवटची वेळ
कधी नजरेला पडली..
अन त्यानंतर,
सुरु झालेला संघर्ष
ओळख शोधण्याचा..
कोणी बोले मला कोळसा..
कुणी बोले
माखला चिखल जरासा..
ठाऊकच नाही कोणाला...
उरावर माझ्या आहे ठसा..
त्या राधेचा...
अन मिरेचाही..
विरक्त प्रेम...आतुरलेले...
अन निर्विकार प्रेम...
बहरुन आलेले..
दोन्ही 
पार जवळुन पाहीलेय मी..
झुरणं दोघींचेही... 
कान्हापायी...
तोच निळा कान्हा...
जणु साक्षात सुर्यबिंब 
निळं उत्तरीय लेवुन 
धरणीवर अवतरीत झालेलं..
अन तीच ती खुळी राधा...
दोघांच्या प्रेमरसात
आकंठ न्हालेला मी...
अन दुस-या बाजुस..
ती मीरा..राजपद सोडुन 
संन्यासी झालेली...
त्याच निळ्या कान्हापायी..
अन तिच्या भक्तीत भिजुन
शेंदुर लेपुन..
देवपदास गेलेला मी.
तोच तो दगड...
अडगळीतला...
विस्मरणात गेलेला...
भर पहाटे कोसळणा-या
दवाची वाट बघत...


ओंकार

No comments:

Post a Comment