Thursday, February 10, 2011

"निखळलेलं पान"

सहजच पानं उलटत होतो...
डायरीची....तेवढ्यात एक पान...
अगदी सहज निखळलं...
थोडस जिर्ण झालेलं..
त्यावर लिहीलेल्या व्यक्तीरेखेसारखचं...
त्यांच नाव....
खरचं माहीत नाही...
किंबहुना कधी विचारलेच नाही...
कुठल्यातरी “ओल्ड एज होम” मध्ये राहायचे...
ते म्हणायचे त्याला “सेकंड इनींग होम”...
जुनाच प्रकार...
फक्त नवं पँकींग....
घरच्यांना नकोसे झालेले ...
बरेच जण राहायचे तिथे....
सगळेच समदुःखी...
तसा माझा त्यांचा परीचय...
आमच्या हॉस्टेलला यायचे...
पापड..शेव विकायला....
त्यानेच त्यांचे पोट भरायचे...
नेहमीचा शर्ट आकाशी अन...
हातात...एक भली मोठी पिशवी....
एका खांद्यावर..एक झोळी...
ती पिशवी उचलायची ताकद
त्यांच्यात यायची तरी कुठुन देवास ठाऊक...
सहज बोलुन जायचे...
वाळक पानं...एकदिवस असचं गळुन जाईल...
त्याआधी तरी जगावं म्हणतोय...
अनेकदा मी थोडे जास्तीचे पैसे देऊ केले...
मी बोलायचो की....
माझ्या आजोबांसारखे आहात तुम्ही...
तर चटकन,
खांद्यावरची झोळी सरकवत बोलायचे...
एक ग्लास पाणी पाज बस होईल...
त्यांना विचारले घरचे कोणी येत का भेटायला?...
तर कधीच काही बोलेले नाहीत....
पण माझ्या हॉस्टेलमधल्या शेवटच्या दिवशी..
ते न सांगता हजर....
आज पिशवी सोबत नव्हती...
मी विचारले
आज पापड नाही ?....
ते इतकेच म्हणाले नाही आज तुला भेटायचे होते...
माझा मुलगा अमेरीकेत डॉक्टर आहे...
बापाला पोसणे...स्टेटसला सुट होत नाही....
म्हणुन दवापाण्याच्या नावाखाली इकडे सोडले.
बायको सोडुन गेली..
आता वाट बघतोय....पुढल्या प्रवासाची....
इतकेच बोलुन निघुन गेले
त्यांची ती सदैव थरथरणारी काया
आजही डोळ्यासमोर जशीच्या तशी आहे.
रोज एकच प्रश्न विचारत...
ज्या बापाने पोराला इतकं मोठं केलं त्याची किंमत काय?
आयुष्यात.....
अन मी मुका होऊन उत्तर शोधणारा आजही
त्या माझ्या डायरीच्या निखळलेल्या पानांत


ओंकार

No comments:

Post a Comment